कोकणच्या निसर्गरम्य परिसरात, सहायाद्रीच्या तळवटी, भगवान परशुरामांच्या पुण्यभूमीत, वाशिष्ठीच्या तीरावर, गोविंदगडाच्या पायथ्याशी असंख्य भक्तगणांच्या हाकेला साद देत श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी हे जागृत व जाज्वल्य देवस्थान आठव्या शतकापासून वसलेले आहे.
श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचे हे देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. श्री देवी करंजेश्वरी ही पटवर्धन , गोळे, दीक्षित पुराणिक आदी ब्राह्मणकुलांची कुलस्वामिनी आहे. पटवर्धन या आडनावाचा उल्लेख इ. स.च्या आठव्या शतकापासून महाराष्ट्राच्या इतिहासात आढळतो असे रियासतकार म्हणतात. ज्याअर्थी पटवर्धन कुळे आठव्या शतकात होती त्याअर्थी त्यांची कुलस्वामिनी श्री करंजेश्वरी ही आठव्या शतकाच्या पूर्वीसून प्रसिद्ध असली पाहिजे ही गोष्ट उघड आहे.
करंजीच्या झुडुपात देवी प्रकट झाली म्हणून तिला ‘करंजेश्वरी’ हे नामाभिधान प्राप्त झाले. देवी करंजीच्या झुडुपात प्रकट झाली म्हणून तिच्या कुळभक्तांनी करंजीचे तेल वापरू नये अशी रूढी परंपरा आहे. हे करंजीचे झुडूप पेठमाप येथे ज्या जागी होते त्या स्थानाला आता ‘शिंगासन’ असे म्हणतात. श्री देवी जेव्हा वरील स्थानी प्रकट झाली तेव्हा तिने एक कुमारीकेजवळ हळदीकुंकू मागितले. ते आणण्यास ती कुमारीका गेली असता तेथून देवी गुप्त झाली व विद्यमान मंदिराच्या स्थानी प्रकट झाली. नंतर एका भक्ताच्या स्वप्नात येऊन "वरील करंजीच्या झुडूपात माझ्या नथीतील मोती अडकून राहिला आहे, तो घेऊन ये" असा दृष्टांत दिला. त्याप्रमाणे तो मोती तेथेच सापडला.
व्याघ्रवाहिनी चतुर्भुज देवी करंजेश्वरीच्या माहेर-सासर (पेठमाप-गोवळकोट) वासियांसाठी आवश्यक ती भूमी उपलब्ध व्हावी म्हणून जणु काही वाशिष्ठी नदी दुभंगून गोविंदगडाला उत्तर-दक्षिण असा वळसा घालून देवीच्या पायथ्याशी एकसंध होते.
हे देवस्थान ज्या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे, त्या किल्ल्याचे आजचे नाव जरी ‘गोवळ-कोट’ असले तरी त्याचे मूळ नाव गोविंदगड असे असून ते तुळाजी आंग्रे यांनी ठेवलेले आहे.
या गोविंदगडाच्या रक्षणार्थ सभोवार बारा बुरुजांची व्यवस्था आहे. या गडावर वस्ती नाही. आत एक पाण्याचा तलाव असून त्याची लांबी ४८ फूट, रुंदी ४४ फूट व खोली २२ फूट आहे. या गडाला उत्तरेस एक व पूर्वेस एक असे दोन दरवाजे असून त्याच्या दक्षिणेकडील भिंतीत एक मूर्ती बसविलेली आहे. तिचे नाव ‘देवी रेडजाई’ असे आहे. ही मूर्ती इ. स. १६६० च्या पूर्वीची असल्यामुळे हा गड छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बांधला असावा असे अनुमान करण्यास वाव आहे.
या गडावर श्री देवीची पालखी फाल्गुन शुक्ल त्रयोदशी या दिवशी जाते व गडावर ज्या ठिकाणी शिवप्रभूंचा दरबार भरत असे तेथे आसनस्थ होऊन शास्त्रोक्त पूजाविधी सुरू असताना तोफांची मानवंदना दिली जाते. श्रींची पालखी गडावरून परतून मंदिराच्या प्रांगणात आल्यानंतर पूजा होते व शिमग्याचा महोत्सवाचा प्रारंभ होतो.
इ. स. १७५५ ते १८१७
पर्यंतच्या काळात या गडाचे स्वामित्व पेशव्यांकडे होते. उत्तरेस भगवान परशुरामांचे वास्तव्य असलेल्या पर्वताचे नाव 'महेंद्र' असे आहे. या दोन्हीमधून वाशिष्ठी नदी वाहाते. हा गड व त्या परिसरातील भूमि वंदनीय श्री शिवप्रभूच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली असून त्यांनी श्री देवी करंजेश्वरीचे साक्षात भवानी मातेच्या रुपात दर्शन घेतले आहे. गोवळकोट ठाणे श्री. रामचंद्र हरि पटवर्धन यांनी मोठ्या शिताफीने व अतिव शौर्याने काबीज केले.
दि. २ मे १६९९ रोजी
छत्रपती राजाराम महाराज यांनीही श्री देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
दि. २ मार्च १७०० रोजी
छत्रपती राजाराम यांनी स्वतः येऊन वरील गडाची तपासणी केली.
दि. १७ नोव्हेंबर १७०० रोजी
जंजिरेकर सिद्दी यांचे पारिपत्य करण्यासाठी ताराबाई राणीसाहेबांनी कान्होजीराव झुंजारराव व मरळ देशमुख यांना
सात हजार फौजेसह कुंभार्ली घाटाने चिपळूण मुक्कामी पाठविले. त्यांनी प्रथम श्री देवीचे दर्शन घेतले.
दि. ४ मार्च १७०१ रोजी
दादोजी मल्हार यांनी कोकणातील जंजिरेकर सिद्दी यांचा बिमोड करुन श्रीदेवीचे दर्शन घेतले.
मार्च १७८१
इंग्रजांचा बंदोबस्त करण्यासाठी परशुरामभाऊ पटवर्धन हे तळकोकणात आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची कुलदेवता श्री देवी करंजेश्वरीचे दर्शन घेतले. पटवर्धनांचे मूळ पुरुष हरभट यांनी देवीची पूजा केली.
दि. १९ मार्च १८४९
सांगली संस्थापक श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांचा मुक्काम दि. १९ मार्च १८४९ रोजी कोतवडे येथे असताना 'गोवळकोटहून काल कर्जाईचा अंगारा व नारळ तेथील मुसलमान खोत यांनी पत्रसहीत' सामोरे गेले - अशी नोंद सापडते.
दि. २५ मार्च १८४९
मु. चिपळूण, प्रातः काळी स्वारी दहिवलीहून निघाली ती गोवळकोटास करंजेश्वरी दर्शनास गेली. नंतर दक्षिणे जवळील गावात श्री गणपति मंदिर आहे तेथे येऊन भोजने झाली.
दि. २६ मार्च १८४९
गोवळकोटचे मुसलमान खोत सकाळी खाशांच्या भेटीस येऊन त्यानी फर्मास जिन्नस नजर केले. गावातील खेळे टिपऱ्या खेळतात त्या तन्हेने खेळे फार आले होते. त्यास मानधन दिले.
दि. २७ मार्च १८४९
खाशासवारी व खाशी मंडळी गोवळकोटास करंजेश्वरीस गेली. महापूजा केली, दक्षणा व लुगडे खण दिले. महारुद्र श्रीसूक्तांच्या आवृत्ती ब्राह्मणाकडून करविली. आज श्रींची सुमराधना करायचा बेत करुन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन झाले. भोजनास पात्र सुमारे ८०० जाहाले. ब्राह्मणास दक्षणा दोन आणे प्रमाणे दिली. अशी ही नोंद आहे.